धाराशिव महाराष्ट्राच्या मराठवाडा प्रदेशात वसलेले, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपणारे एक महत्त्वपूर्ण शहर आहे. धाराशिव ज्याला पूर्वी उस्मानाबाद या नावाने ओळखले जात होते. हे ठिकाण विविध पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे. ज्यामुळे येथील सौंदर्य, धार्मिक महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा उलगडतो. धाराशिवला भेट देण्यासाठी अनेक कारणे आहेत, त्यापैकी काही प्रमुख पर्यटन स्थळांबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ.
पर्यटन स्थळे –
1. धाराशिव लेणी :
धाराशिव लेणी म्हणजेच धाराशिव गुफा, हे या शहराचे प्रमुख आकर्षण आहे. धाराशिव लेणी धाराशिव पासून 6 कि.मी. अंतरावर बालाघाट डोंगररांगेत आहेत. या लेण्या इ.स. सहाव्या शतकात कोरल्या गेल्या आहेत आणि सुमारे 11 लेणींचा समूह आहे. या मध्ये बौद्ध लेण्यांचा जास्त समावेश आहे. यातील काही लेणींमध्ये स्तूप आणि कोरीव शिल्पे आढळतात. या लेण्यांमधील मूर्तिकला आणि वास्तुशिल्प अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. या लेण्यांमध्ये बौद्ध, हिंदू आणी जैन अश्या लेण्यांचा समावेश आहे.
2. तुळजाभवानी मंदिर :
तुळजाभवानी मंदिर धाराशिवपासून 22 कि.मी. अंतरावर तुळजापूर येथे स्थित आहे. हे मंदिर देवी तुळजा भवानीसाठी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातील साडे-तीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. हे मंदिर बाराव्या शतकात बांधले गेले. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजामाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर गोमुख तीर्थ येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक येथे स्नान करतात तसेच हातपायही धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे प्रत्येक वर्षी लाखो भक्त येथे येऊन देवीचे दर्शन घेतात. तुळजाभवनी देवी ही छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्यदैवत आहे. या मंदिराचा परिसर आणि त्याची ऐतिहासिक महत्त्व पर्यटकांना आकर्षित करते.
3. नळदुर्ग किल्ला :
धाराशिवपासून सुमारे 57 कि.मी. अंतरावर नळदुर्ग किल्ला स्थित आहे. हा किल्ला प्राचीन काळातील महत्त्वाचा किल्ला आहे आणि त्याचे वास्तुशिल्प अत्यंत आकर्षक आहे. किल्ल्याच्या परिसरात एक मोठे तळे आहे ज्याला “पाणी महाल” म्हणतात. नळदुर्ग किल्ल्याचा इतिहास विविध राजवंशांनी व्यापलेला आहे, ज्यात आदिलशाही, मुघल आणि निजामशाही यांचा समावेश आहे. हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला म्हणून गणला जातो. याची तटबंदी जवळजवळ 3 कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीमध्ये एकूण 114 बुरुज आहेत. या किल्ल्यामधील नर-मादी धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. या किल्ल्यामध्ये एकूण 12 तोफा आहेत. या किल्ल्यामध्ये दारू गोळा कोठार, धान्य कोठार, हत्तीखाना, जोड इमारत, शिवकालीन इमारत, तुरुंग कोठडी, राणी महाल, रंगमहाल, बारादारी-राजवाडा इ. इमारती आहेत. हा किल्ला इतिहास प्रेमी आणि निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी आदर्श ठिकाण आहे.
4. परंडा किल्ला :
धाराशिवपासून सुमारे 67 कि.मी. अंतरावर परंडा किल्ला स्थित आहे. हा किल्ला अत्यंत मजबूत बांधणीसाठी ओळखला जातो आणि याची संरचना अत्यंत आकर्षक आहे. देवगिरी (दौलताबाद) नंतर दख्खनचे प्रवेशद्वार म्हणून या किल्ल्याची ख्याती होती. हा किल्ला बहामनी सुलतानांचा वजीर महमूद गवानने सुमारे १५ व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. हा किल्ला 35 मी लांब व तेवढाच रुंद पसरलेला आहे. या किल्ल्यामध्ये राणी महाल, इरोका महाल, न्यायालय, हमामखाना, झरोका महाल, दारू कोठार इ. इमारती आहेत. या किल्ल्यात जामा मशीद तसेच महादेव मंदिर आणि नृसिंह मंदिर आहे. या किल्ल्यात पाण्याची गरज भागवण्यासाठी 4 विहिरी आहेत. त्यापैकी 2 विहिरी किल्ल्यामध्ये तर 2 किल्ल्याबाहेरील खंदकामध्ये आहेत. परंडा किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू आणि शिल्पकला बघण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात.
5. कै. रामलिंगअप्पा लामतुरे संग्रहालय – तेर :
धाराशिव पासून 27 कि.मी. अंतरावर असलेल्या तेर गावामध्ये हे संग्रहालय स्थित आहे. या संग्रहालयात प्राचीन वस्तूंचा जास्त समावेश आहे. या संग्रहालयासाठी लामतुरे यांनी त्यांच्या जवळच्या जवळपास 5000 पुरातन वस्तू शासनाला दिल्या. या संग्रहालयात साच्यात बनवलेल्या मातीच्या वस्तू असून त्याचबरोबर सातवाहन व इतर राजघराण्याची नाणी, शंखाच्या व हाडाच्या वस्तू, हस्तिदंताच्या वस्तू, कोरीव काम केलेल्या वस्तू, नाणी इत्यादी वस्तू मोठ्या संख्येने आहेत.
6. येडाई – येडेश्वरी देवी मंदिर :
धाराशिव पासून 34 कि.मी अंतरावर येरमाळा या ठिकाणी येडेश्वरी देवीचे ‘ येडाई ‘ या नावाने ओळले जाते. हे मंदिर प्राचीन असून हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधले आहे. हे मंदिर बालाघाट डोंगररांगेत वसलेले आहे. चैत्र महिन्यात तसेच नवरात्रीत या मंदिरात भाविकांची खूप गर्दी पाहायला मिळते. या मंदिरास दोन प्रवेशद्वार आहेत. त्यापैकी मुख्य दारासमोर तीन दीपमाळा आहेत. भाविकांसाठी हे मंदिर एक महत्वाचे आहे.
7. माणकेश्वर मंदिर :
धाराशिवपासून 58 कि.मी अंतरावर भूम तालुक्यात हे मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून हेमाडपंती स्थापत्य शैलीत बांधले आहे. मानकेश्वर चे हे मंदिर महादेवाचे आहे. हे मंदिर त्याच्या स्थापत्य व शिल्प कलेवरुन चालूक्य कालीन असावे असे वाटते. या मंदिरातील खांबावर विविध स्वरूपाचे नक्षिकाम तसेच विविध मुर्त्या कोरलेल्या आहेत. वास्तुकलेचा एक उत्तम नमुना म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते.
8. भैरवनाथ मंदिर :
धाराशिव पासून 82 कि.मी. अंतरावर असलेल्या सोनारी येथे भैरवनाथ मंदिर आहे. समर्थ रामदासांचे शिष्य कल्याणस्वामी यांनी लिहिलेल्या भैरवनाथ महात्म्यात या मंदिराचा उल्लेख आढळतो. मंदिरजवळ दोन कुंड आहेत त्यापैकी एक लोहतीर्थ आणि दुसरे सुवर्णतीर्थ या नावाने ओळखले जाते. या मंदिरास दोन प्रवेशद्वार आहेत, यातील पूर्वेकडील प्रवेशद्वारास नगरखाना आहे. मंदिरामध्ये चार आकर्षक दीपमाळा आहेत. कार्तिकी आणि चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेला भाविकांची खूप गर्दी पाहावयास मिळते.
9. रामलिंग :
धाराशिव पासून 22 कि.मी. अंतरावर असलेल्या येडशी येथे रामलिंग वसलेले आहे. इथल्या वैशिष्टपूर्ण आणि वैविध्यपूर्ण भुरचनेमुळे या ठिकाणास मराठवाड्याचे प्रवेशद्वार असे मानले जाते. येथे रामलिंग मंदिर आणि दुर्गादेवी मंदिर खाली खोल दरीत आहेत. त्याचबरोबर दरीकाठावर असलेले रामलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. येडशी – रामलिंग घाट हे अभयारण्य क्षेत्र निसर्गाने नटलेले आहे. येथे पावसाळ्यात असलेला धबधबा, परिसरातील घनदाट जंगल, वैविध्यपूर्ण वृक्षराजी आणि विविध प्राणी व पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले रामलिंग हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
धाराशिवच्या पर्यटन स्थळांनी येथील सौंदर्य, धार्मिक महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा उलगडतो. येथे आलेल्या पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळतो.